संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):–राज्यात पशुधनाची मोठी संख्या असून विविध संसर्गामुळे जनावरांना ताप येणे किंवा दुभत्या गाईंना कासामधील संसर्गाने (मस्टीटीस ) आजारामुळे विविध संसर्ग होत असतात. यामुळे शेतकऱ्यांचा पशुधनाच्या आजारावर मोठा खर्च होत असून वेळही लागतो . हे सर्व टाळण्यासाठी काँग्रेस पक्षाचेनेते आ बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाच्या प्रयोगशाळेत राज्यात प्रथम सर्व संसर्ग रोगांवर जलद व अचूक निदान करणारी आरटीपीसीआर ही नवी टेस्ट कार्यान्वित करण्यात आली असून याचा फायदा हजारो पशुधनासाठी होणार असल्याने शेतकऱ्यांचा खर्च व वेळ वाचणार असल्याची माहिती राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी दिली आहे.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ येथे या नवीन संशोधनाबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी समवेत पशुमस्य विज्ञान विद्यापीठाचे माजी संचालक व डीन डॉ. अब्दुल समद, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर ,संचालक विक्रम थोरात, क्वेचर लॅबचे संदीप काळे, पशुधन विभाग प्रमुख डॉ विजय कवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या राजहंस प्रयोगशाळेत क्वेचर लॅबच्या सहकार्याने ही नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जनावरांना विविध परजीवी संसर्गामुळे ताप येत असून यामुळे त्या जनावरांना प्रथम अँटिबायोटिक त्याचप्रमाणे बुटानीक्स अशी औषधी दिली जातात .यामध्ये वेळही जातो आणि खर्चही वाढतो कधीकधी जनावर दगावण्याचाही धोका असतो. याचबरोबर कासेतील आजारामुळे सडांमधून रक्त येणे, दुर्गंधी येणे असे प्रकार होतात हे सर्व टाळण्यासाठी व जनावरांवर तातडीने उपचार करण्यासाठी बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेजचे मा. डीन डॉ समथ अब्दुल यांनी दोन्ही आजारांवर अचूक व कमी वेळेत निदान करणारी नवीन आरटीपीसीआर कार्यप्रणाली राजहंसच्या प्रयोगशाळेत विकसित केली आहे.
या प्रणालीत तापाचा प्रादुर्भाव वाढवणारे रक्तातील परजीवी थेलेरियासिस, बेबीसिओसीस , ॲनाप्लाज्मोसिस , आणि ट्रिपॅनोसोमियासिस यांची लक्षणे शोधून त्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य व तात्काळ उपचाराची पद्धती दिली जाणार आहे.
तसेच दुधाळ गाईंना कासेतील होणारा (मस्टीस्टीस) आजार म्हणजे सडामधून रक्त येणे, पू येणे, सूज येणे यावर तात्काळ उपाय करणे सहज शक्य होणार आहे. या संशोधन प्रणाली ताप आलेल्या जनावरांच्या कानामागील नसेमधून व दुधाळ गाईंच्या सडामध्ये आजार झाला असेल त्यातील रक्ताचा थेंब घेऊन याची चाचणी त्वरित करता येणार आहे . अवघ्या चार तासात सर्व आजारांचे निदान होऊन त्या स्थानिक डॉक्टरांसह शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे आजार त्याची लक्षणे व त्यावर करावयाचे उपाय कळवले जाणार आहे. यामुळे वेळ वाचणार असून औषध उपचाराचा खर्चही कमी होणार आहे. साधारणपणे गाईंना ताप आल्यानंतर 5 हजाराचा खर्च होतो. राजहंस दूध संघाकडून अवघ्या 700 रुपयांमध्ये ही तपासणी होणार आहे.
यावेळी रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, संगमनेर तालुक्यात मोठे पशुधन असून आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी दूध संघाकडून सातत्याने विविध आरोग्य योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी राजहंस संघाच्या प्रयोगशाळेतच ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारची सुविधा शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. राज्यात हा प्रथमच प्रयोग राबवला जात असून ही किट व औषधे राजहंस मेडिकल मध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असल्याचीही ते म्हणाले.
तर डॉ.समथ अब्दुल म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी राज्यात हा प्रथम प्रयोग होत आहे. अत्यंत सोप्या साध्या पद्धतीने व कमी वेळेत शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचा आजार आलेला ताप किंवा कासेतील झालेला आजारावर उपाय करता येणार आहे. संगमनेरचा हा पॅटर्न राज्यभर अनुकरणीय ठरेल असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा खर्च वाचणार जनावरांना ताप आल्यानंतर त्या तापाची तपासणी व त्यावर औषध उपचार हा साधारण 5000 रुपये खर्च येतो. मात्र या नवीन संशोधनामुळे अवघ्या 700रुपयात सर्व तपासणी होणार असून 1200 ते 1500 रुपये पर्यंत खर्चातून आजार बरा होणार आहे .यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वेळ आणि त्यांचे पशुधनही वाचणार असल्याने त्यांना या नव्या आरटीपीसीआर संशोधनातून मोठा दिलासा मिळाला आहे..



