श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने (ईद-ए-मिलाद ) सकाळी काढण्यात आलेला जुलुस तब्बल चार तास चालला. दुपारी एक वाजता जामा मशिदी जवळ तो स्थिरावला.
श्रीरामपूर शहर आणि उपनगराबरोबरच तालुक्यातील बेलापूर खिर्डी एकलहरे, टिळक नगर,खानापूर,मुठे वाडगाव, महांकाळ वाडगाव, पढेगाव मालुन्जा, भेर्डापूर अशा मोठमोठ्या गावातही तो मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
लहानांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत अनेकांनी या जुलूस मध्ये सहभाग घेतल्याने हा जुलूस आजपर्यंतच्या इतिहासात अभूतपूर्व असा ठरला.
पांढरे शुभ्र कपडे परिधान करून सकाळीच शहरा बरोबरच उपनगरातील तरुण आणि आबाल वृद्ध हातात हिरवे झेंडे घेत जामा मशीद जवळ जमा झाले.
या ठिकाणाहून हा जुलूस जामा मशीद पाठीमागच्या भागावरून मार्गक्रमण करत उर्दू हायस्कूल,हमीद चौधरी कॉम्प्लेक्स, गुलशन चौक, इनामूल मसजिद, मार्गे काजी बाबा रस्त्याने तो पुन्हा जामा मशीद येथे थांबला.
मौलाना इमदाद अली, मौलाना अतहर, हाजी तनवीर रजा, मौलाना जहुर अली , मौलाना कैसर आदींनी या जुलूसचे सारथ्य केले. ताजुशरिया कमिटी सह शहरातील अनेक तरुण संघटनांनी देखील या जुलूस मध्ये आपला सहभाग नोंदवीत तो साजरा केला.
तालुक्यातील ग्रामीण भागातील मशिदीत सकाळी नमाज ए फजर नंतर पैगंबर यांच्या विषयी माहिती देत काही ठिकाणी कुराण पठण करण्यात आले.
शहराच्या अनेक चौकाचौकात लाडू पेढे गोड भात प्रसाद म्हणून देण्यात आला. अनेक राजकीय पुढाऱ्यांबरोबरच अनेक सामाजिक कार्यकर्ते यांचा यावेळी जामा मशिदीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वच ठिकाणी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त होता.



