शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून दिड कोटी सदस्य नोंदणीच्या ध्येयपुर्ती समारंभाच्या निमित्ताने ‘मजबूत संघटन कार्यकर्ता संमेलन’ प्रत्येक मंडळात रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ध्येयपुर्तीचा जल्लोष कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी पक्षाचे झेंडे लावून साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
या संदर्भात माहीती देतांना पालकमंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून ओळखला जात आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटनात्मक घोडदौडही यशस्वी होत असून, या माध्यमातूनच भारतीय जनता पक्षाची विचारधारा गावपातळीवर बुथस्तरापर्यंत पोहोचली आहे. पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाल्यानेच लोकसभा निवडणूकीत भाजप आणि मित्र पक्षाला यश मिळाले आणि नरेंद्र मोदीयांना सलग तिस-यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाला असून, देशातील २० राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तास्थानी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. सदस्य नोंदणी पर्वामध्ये बुथस्थरावरील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिका-याने सक्रीयपणे योगदान दिल्यामुळे राज्यात दिडकोटी सदस्य नोंदणीचे उदिष्ठ पुर्ण झाले आहे. या ध्येयपुर्तीचा आनंदोत्सव पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने साजरा करण्यात येणार असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.
स्थापना दिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वा. दुरदृष्य प्रणालीतून राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक मंडळामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघाचे कार्यकर्ता संमेलन कुंदन लॉन्स राहाता येथे आयोजित करण्यात आले आहे. स्थापना दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी आपल्या घरावर पक्षाचा झेंडा उभारुन कुटूंबा समवेत सेल्फी काढण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. विविध सामाजिक उपक्रमातून नागरीकां पर्यंत पोहोचण्यासाठी बुथस्तरावर विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.




Total Users : 633739