नेवासा(जनता आवाज वृत्तसेवा):-नवीनच झालेल्या शेत तळ्यात उतरलेल्या दोन निरागस पावलांनी जगाचा निरोप घेतला… मायेच्या कुशीतून निसर्गाच्या कवेत गेलेली ही दोन बालके आता कधीच परत येणार नाहीत, ही कल्पनाही कुटुंबाला काळजाला चिरून जाणारी आहे.
शनिवारी दुपारी नेवासा तालुक्यातील गेवराई येथे, मयूर संतोष शिनगारे (वय १२) आणि पार्थ उद्धव काळे (वय ७) ही दोन शाळकरी मुले खेळता खेळता शेततळ्याकडे गेली. त्याच शेतात आई-वडील मिरच्या तोडण्यात मग्न… आणि या दोघांनी निरागसपणे पाण्यात उडी घेतली. पण पोहता न येणाऱ्या या चिमुकल्यांना पाण्याची खोली जाणवली नाही. काही क्षणांतच तळ्याच्या खोल पाण्यात त्यांचा जीव गुदमरत गेला.
काही अंतरावर काम करणाऱ्या महिलांना बालकांच्या आवाजाने हादरवून सोडलं. त्यांनी आरडाओरड केली, पण तोवर सर्व उशीर झाला होता. ४० फूट खोल शेततळ्यात पोहणाऱ्यांना पोहोचता आलं नाही. शेवटी जेसीबीच्या मदतीने तळ्याचा भराव फोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नेवासा फाटा येथील रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. व शिवविच्छेदन करण्यात आले
गेवराई गावावर शोककळा पसरली आहे. मयूर आणि पार्थ हे घरातील लाडके होते. पार्थ चे वडील उद्धव काळे यांनी हे शेततळे पंधरा दिवसापूर्वीच बनवले होते व त्यात दोन दिवसापूर्वीच पाणी भरलेले होते मुलांच्या अचानक जाण्याने काळजाचा ठोका चुकला आहे. गावातील वातावरण अवघडून गेले आहे. अखेरचा निरोप देताना हृदय पिळवटून निघाले. अश्रूंनी ओली झालेली माती आणि काळजात घर करून गेलेला रितेपणा, हे दुःख लवकर संपणारे नाही