spot_img
spot_img

निर्मळ पिंपरीत गर्भलिंग तपासणीवर पोलिसांचा छापा; डॉक्टरसह एजंट ताब्यात, साहित्य जप्त

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):-तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात निर्जन ठिकाणी सुरू असलेल्या गर्भलिंग तपासणीच्या प्रकारावर पोलिसांनी छापा टाकत एका डॉक्टरसह एजंटला ताब्यात घेतले. या कारवाईत तपासणीसाठी आलेल्या महिलांनाही सुरक्षित ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळावरून वैद्यकीय यंत्रसामग्रीसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लोणी–निर्मळ पिंपरी रस्त्यालगत निळवंडे कालव्याच्या कडेला शेतातील दोन खोल्यांमध्ये हा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ पथक नेमण्यात आले. श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

छाप्यात निर्जन शिवारात उभारलेल्या दोन खोल्यांमध्ये गर्भलिंग तपासणीसाठी वापरले जाणारे सोनोग्राफी (अल्ट्रासाऊंड) मशीन, मॉनिटर, बॅटरी वीजपुरवठा यंत्रणा, जेल, वैद्यकीय कागदपत्रे तसेच इतर उपकरणे आढळून आली. ही सर्व यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली आहे.

घटनास्थळी उपस्थित डॉक्टर, एजंट तसेच संबंधित महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, संपूर्ण कारवाई पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने पार पाडली.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, या बेकायदेशीर प्रकारामागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!