श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-पोटाच्या आजारावर उपचार करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर वारंवार अत्याचार करत तिच्याकडून तब्बल १८ ते २० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी स्वयंघोषित महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित महिला श्रीरामपूर परिसरातील रहिवासी असून, २०२३ मध्ये तिला पोटाच्या अल्सरचा त्रास होता. त्यावेळी खटकाळी येथील गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज हे उपचार करून आजार बरा करतात, अशी माहिती तिला मिळाली. त्यानुसार ती त्यांच्या आश्रमात गेली असता, आरोपीने लिंबू व उदी देऊन पाण्यात मिसळून पिण्यास सांगितले. ते पिल्यानंतर महिलेला चक्कर येत असली तरी काहीसा फरक जाणवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपीने १५ हजार रुपयांची मागणी करून पाच दिवसांनी पुन्हा येण्यास सांगितले.
पाच दिवसांनी महिला पुन्हा गेली असता आरोपीने प्रसाद म्हणून खडीसाखर, पेढा व उदी दिली. तो प्रसाद खाल्ल्यानंतर महिलेला पुन्हा चक्कर आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपीने तिला घराच्या मागील खोलीत नेऊन दरवाजा बंद केला. तेथे लिंबूपाण्यात औषध देताच तिची शारीरिक शक्ती कमी झाल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने महिलेला फोन करून आश्रमात आली नाहीस तर आजार वाढेल, अशी धमकी देत पुन्हा पुन्हा बोलावले. भीती व बदनामीच्या दबावाखाली महिला आश्रमात जात राहिली. प्रत्येक वेळी आरोपी दक्षिणाच्या नावाखाली पैसे व सोन्याची मागणी करत होता. आतापर्यंत सुमारे १८ ते २० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
तसेच ऑगस्ट २०२५ मध्ये महिलेच्या घरी आणि जानेवारी २०२६ मध्ये आश्रमात पुन्हा धमकावून तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूक आणि अत्याचाराच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील दोन भाऊंची चौकशी होणार
गेल्या काही दिवसांपूर्वी बेलापूरातील गणेशबाबा याच्याशी जिल्ह्यातील दोन बडे भाऊ संपर्कात असल्याचे चर्चा नागरिकात होत आहे. बलात्कारी गणेश बाबा याच्यासोबतच जिल्ह्यातील त्या राजकीय दोन भाऊंचा ही भांडाफोडे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ते दोन राजकीय पक्षातील बडे भाऊ कोण? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.



