श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- लोणी परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास अधिक गडद होत असून, या रॅकेटमागे राज्यव्यापी साखळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांचे पती यांचा समावेश आहे. श्रीरामपूर येथील डॉ. कुटे बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तपासादरम्यान आणखी दोन आरोपींची नावे पुढे आली असून हे दोघे पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. नेवासा येथील डॉ. भणगे आणि प्रदीप ढगे यांनी गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन याच आरोपींकडून खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. संबंधित आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय, ज्या गर्भवती महिलांचे बेकायदेशीर लिंगनिदान करण्यात आले, त्यांची ओळख पटवून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. काही महिलांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यापैकी तिघींचे गर्भपात करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हे गर्भपात अटक आरोपींच्या दवाखान्यांत एजंटांच्या मदतीने करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
दरम्यान, या रॅकेटचे धागेदोरे जिल्ह्याबाहेरही पसरले आहेत का? याचाही तपास सुरू असून आणखी काही डॉक्टर, एजंट आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रॅकेटची कार्यपद्धती धक्कादायक
एजंट आठ ते दहा गर्भवती महिलांचा गट तयार करत होते. ठरावीक दिवस व वेळ निश्चित करून महिलांना पती किंवा नातेवाईकांसह बोलावले जात होते. महिलांचे नातेवाईक एका ठिकाणी थांबवून एजंट महिलांना चारचाकी वाहनातून अज्ञातस्थळी नेत होते. तेथे सोनोग्राफीद्वारे गर्भलिंग निदान केले जात होते. तपासणीनंतर महिलांना पुन्हा मूळ ठिकाणी आणून सोडले जात होते. एका गर्भलिंग निदानासाठी डॉक्टरला सुमारे १० हजार रुपये मिळत होते. एजंटांना प्रत्येकी तीन हजार रुपयांपर्यंत कमिशन दिले जात होते. एकापेक्षा अधिक एजंट सहभागी असल्यास रकमेची मागणी वाढवली जात होती.



