नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा): – ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.१२) विविध सामाजिक उपक्रम राबवत “संकल्प दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सोनई येथील कौतुकी नदी पुनर्जीवन व सुशोभीकरण उपक्रमाचा शुभारंभ वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गरजू कुटुंबातील ५१ मुलींचे शैक्षणिक दत्तक पालकत्व स्वीकारण्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बाबा अनारसे यांनी केले. यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कौतुकी नदीचे पुनर्जीवन आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. दत्तकग्राम, ‘गाव तिथे वाचनालय’, संकल्प साध्या विवाहाचा, मरणोत्तर नेत्रदान, वृक्षारोपण आणि संगोपन असे अनेक उपक्रम वर्षभर सुरू असतात.
ते पुढे म्हणाले की, सोनईसह परिसराची जीवनदायिनी असलेल्या कौतुकी नदीचे २०१२ मध्ये प्रशांत गडाख यांनी यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुशोभीकरण केले होते. मात्र, वाढते नागरीकरण, सांडपाणी आणि कचऱ्यामुळे नदीचा प्रवाह बाधित झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नदीचे पुनर्जीवन आणि दुसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने १० लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. तसेच सोनईसाठी नवीन घंटागाडी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंत प्रतिष्ठानने आजपर्यंत तालुक्यातील ११५ मुलींचे शैक्षणिक दत्तक पालकत्व स्वीकारले असून, यंदा आणखी ५१ मुलींचे पालकत्व स्वीकारण्यात येणार असल्याची घोषणाही शंकरराव गडाख यांनी केली.
यावेळी वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के म्हणाले, “कौतुकी नदीचे पुनर्जीवन आणि निसर्गसंवर्धन हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत. नेवासा तालुका भाग्यवान आहे. यशवंतराव गडाख यांच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभणे ही मोठी बाब असून त्यांचे कार्य राज्याला दिशादर्शक आहे.”असे म्हटले
कार्यक्रमात मा. आ. पांडुरंग अभंग, कारभारी जावळे, प्रकाश शेटे, नागेश आघाव, डॉ. रामनाथ बडे आणि गफूर बागवान यांनी मनोगत व्यक्त केले.तर विश्वासराव गडाख, सुनीलराव गडाख, उदयन गडाख, नंदकुमार पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, संचालक मंडळ सदस्य तसेच तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले. तसेच कौतुकी नदी पुनर्जीवन उपक्रमासाठी नंदकुमार पाटील, ॲड. आण्णासाहेब आंबाडे आणि इस्माईल शेख यांनी देणगी जाहीर केली.
नदी पुनर्जीवनासह ५१ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकी नदी पुनर्जीवन व सुशोभीकरण उपक्रम सुरू करण्यात आला. त्याचबरोबर गरजू कुटुंबातील ५१ मुलींचे शैक्षणिक दत्तक पालकत्व स्वीकारण्याची घोषणा करण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत “संकल्प दिन” उत्साहात पार पडला.



