लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे मंगळवारी दुपारी चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या दोन पुरुष आणि एका महिला चोरट्याने घरातील महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपूर येथील रहिवासी असलेले गणपत देवराम पारधे यांची दुर्गापूर शिवारात वस्ती आहे. मंगळवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घरातील महिला जनावरांसाठी चारा कापून घरी परतली. यावेळी त्यांना घरात दोन अनोळखी पुरुष आणि एक महिला घरातील सामानाची उचकापाचक करताना दिसली.
महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्यांना जाब विचारला आणि चोरीला विरोध केला. मात्र, चोरी उघड झाल्याच्या रागातून त्या तिन्ही चोरट्यांनी महिलेवर हल्ला चढवला. तिला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, या तिघां चोरट्यांनी महिलेच्या झोळीतील लहान बाळालाही वेठीस धरून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. आश्वी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट आणि लोणी पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या.
यावेळी चिंचपूरचे पोलीस पाटील अशोक थेटे, पोलीस पाटील दत्तात्रेय तांबे, दुर्गापूरचे पोलीस पाटील दिलीप पुलाटे, गिताराम तांबे, विवेक तांबे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तर, भरदिवसा घडलेल्या या घटनेत नेमका किती ऐवज अथवा मुद्देमाल चोरीला गेला याबाबत अधिकृत माहिती गुन्हा झाल्यानंतरच समोर येणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागामध्ये चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




Total Users : 614313