राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यामधील एक ‘ निसर्ग उपचार केंद्र’ या क्लिनिकमध्ये कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी डॉ. देशमुख नामक यांच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन तसेच नॅशनल कौन्सिलकडे कोणतेही वैध नोंदणी प्रमाणपत्र नसताना डॉ. देशमुख यांनी स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून रुग्णांची तपासणी व उपचार केल्याचे उघड झाले आहे. मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्टनुसार उपचार करण्याचा अधिकार नसतानाही विविध चिकित्सा पद्धतींचा वापर करून औषधोपचार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच ‘डॉक्टर’ या शब्दाचा गैरवापर केल्याबरोबरच बनावट पदवीची कागदपत्रे तयार करून सादर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मिसाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेताना डॉक्टरांची अधिकृत नोंदणी व पात्रता तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाची भूमिका संशयास्पद
सध्या जिल्ह्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये बनावट डॉक्टर व्यवसाय, तसेच अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये अव्वाचे सव्वा बिल घेतले जाते. यासंदर्भात अनेक प्रकरणे उघडकीस आले होते. परंतु जिल्हा आरोग्य प्रशासन कुठलीही कारवाई केल्याची निदर्शनात आले नाही. कारवाई का केली गेली नाही. किंवा काही आर्थिक तडजोडी झाल्या? अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करणाऱ्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.



