spot_img
spot_img

गोंधवणीत शिवसेना पदाधिकाऱ्यासह सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- गोंधवणी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनावरून झालेल्या वादानंतर जातीय शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शिवसेनेचे पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह सात जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अलीकडेच प्रशांत कहाणे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंधवणी वॉर्ड क्रमांक १ येथील एका महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, ८ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्या आपल्या घरासमोर नातवंडांसोबत बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगाही घरासमोर उभा होता. दरम्यान, श्रीरामपूरकडून गोंधवणीकडे जाणारी एक चारचाकी गाडी भरधाव वेगाने गेल्याने परिसरात खेळणारी लहान मुले घाबरली. यामुळे संबंधित वाहनचालकाला गाडीचा वेग कमी करण्याचा इशारा देण्यात आला.

तक्रारीनुसार, काही अंतरावर गेल्यानंतर संबंधित वाहन पुन्हा फिरवून घरासमोर आणण्यात आले. त्यानंतर गाडीतून उतरलेल्या काही जणांनी वाहनाला दगड कोणी मारला, याचा जाब विचारत वाद घातला. यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाने वाहनाचा वेग कमी ठेवण्याबाबत सांगितल्याने आरोपींनी संतप्त होत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अपमानास्पद वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १८९, १९०, १९२, ३५१(२) आणि ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(va) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात प्रशांत कहाणे, विजू कहाणे, संतोष कहाणे, दिंगबर कहाणे, देविदास कहाणे तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, याच दिवशी रात्री प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने शहरात या दोन्ही घटनांची मोठी चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा स्वतंत्रपणे तपास सुरू केला असून, साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि घटनास्थळावरील परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. गोंधवणी परिसरात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!