संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असलेल्या योगासनाने जागतिक क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे. अहमदाबाद येथील ट्रान्सस्टेडियामध्ये पार पडलेल्या पहिल्याच विश्व योगासन ‘अजिंक्यपद स्पर्धेत’ भारताने या खेळावरील आपले एकतर्फी वर्चस्व सिद्ध करताना सुवर्णमय विजय संपादन केला आहे. वर्ल्ड योगासनने आयोजित केलेल्या या क्रीडा महाकुंभात जगातील 79 देशांमधील 587 योगासनपटूमध्ये भारताने 102 सुवर्ण पदकांसह 114 पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत जपानने उपविजेतेपद पटकावले, अर्जेंटिनाला तिसर्यास्थानावर तर, सिंगापूर आणि नेपाळला उत्तेजनार्थ पारितोषिकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणार्या ध्रुव ग्लोबलच्या सहा योगासनपटूंनी चित्तथरारक सादरीकरणाच्या बळावर उपस्थित हजारों प्रेक्षकांची मने जिंकताना तब्बल 11 सुवर्ण पदके पटकावली.
गुजरातमधील अहमदाबादेत झालेल्या या पहिल्याच वैश्विक स्पर्धेतील भारतीय योगासन संघाच्या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राचा आणि विशेषतः संगमनेरच्या ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’चा वाटा मोलाचा ठरला. भारतीय संघात समाविष्ट असलेल्या 125 खेळाडूंमध्ये सर्वाधिक 23 खेळाडू एकट्या महाराष्ट्रातील होते. त्यातही ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सहा योगासनपटूंनी जागतिक मंचावर भारताचा झेंडा रोवला. रोहन तायडे, तृप्ती डोंगरे, रुद्रांक्षी भावे, प्रांजल व्हन्ना आणि हिंदवी चौरे यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके, तर प्रणव साहुने एक सुवर्णपदक मिळवून वैयक्तिक कौशल्याचा उच्चांक गाठला. एकूण 11 सुवर्णपदके मिळवून या विद्यार्थ्यांनी भारतीय विजयाला धार चढवली. या यशामागे मंगेश खोपकर, विष्णू चक्रवर्ती, मृणाली बाणाईत, ऋषभ शर्मा व शुभम शर्मा या प्रशिक्षकांचे परिश्रम आणि मार्गदर्शन कारणीभूत होते.
चार दिवस चाललेली ही स्पर्धा 10 ते 55 वयोगटांतील सहा वेगवेगळ्या गटांत विभागली होती, ज्यात 12 क्रीडा प्रकारांसह 115 इव्हेंट्स घेण्यात आले. तंत्रशुद्धता, लवचिकता, स्थिरता आणि एकाग्रतेचा सुरेख मिलाफ या स्पर्धेत दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह योगऋषी स्वामी रामदेव, डॉ.जयदीप आर्य व उदित सेठ यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या स्पर्धेने योगासनांचा जागतिक खेळाचा दर्जा अधिक बळकट केला आहे.
या सुवर्ण यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हाईस चेअरमन गिरीश मालपाणी आणि प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विजेत्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. हे यश केवळ एका शाळेचे नसून भारताच्या योग संस्कृतीचा जागतिक विजय असल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या जागतिक योगासन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दूरदर्शनवरुन झालेले त्याचे थेट प्रसारण. या सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रांजल व्हन्ना आणि तृप्ती डोंगरे यांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांसह जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या जागतिक स्पर्धांचे डी.डी.स्पोर्टस् चॅनलवर प्रभावी समालोचन करुन जागतिक योगप्रेमींना खिळवून ठेवण्याची जबाबदारी ‘वर्ल्ड योगासना’चे उपाध्यक्ष आणि ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी यांनी अतिशय कुशलतेने पार पाडली. त्यांची अभ्यासपूर्ण वाणी आणि योगासनांविषयीची सखोल माहिती यामुळे या स्पर्धेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती.




Total Users : 637815