संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- ७६ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या राजस्थान युवक मंडळाच्या सर्वसाधारण सभेचे नुकतेच आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सभेचे संचालन मावळते कार्याध्यक्ष सुमित अट्टल यांनी केले. यावेळी सुमित अट्टल यांनी मागील वर्षभरात मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व जनकल्याणकारी उपक्रमांचा सविस्तर वार्षिक अहवाल तसेच विविध प्रकल्पांचा आर्थिक हिशोब सभेसमोर सादर केला. सदस्यांनी या कामकाजाचे कौतुक करत अहवालास मंजुरी दिली.
त्यानंतर पुढील वर्षासाठी नवीन कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. कार्याध्यक्षपदासाठी मागील वर्षाचे उपाध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्षपदासाठी कल्पेश मर्दा, सचिवपदासाठी कृष्णा आसावा, खजिनदारपदासाठी वेणुगोपाल कलंत्री, सह-खजिनदारपदासाठी सीए शुभम राठी तसेच सह-सचिवपदासाठी दर्शन भंडारी यांनी उमेदवारी दर्शविली. सर्व पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले.
मंडळाचे अध्यक्ष म्हणून मनीष मालपाणी यांची सलग 22 व्या वेळेस निवड करण्यात आली. यावर्षीच्या निवडणुकीतील विशेष आकर्षण ठरले ते कार्याध्यक्षपदी निवड झालेले सागर मणियार. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून संगमनेरमध्ये परिचित असलेले मणियार सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय, ऊर्जावान व मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. कोणत्याही कार्यक्रमात प्रत्येक सदस्याचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून कार्यक्रम यशस्वी करण्याची त्यांची हातोटी विशेष मानली जाते. त्यांच्या व्यापक मित्रपरिवारामुळे आणि संघटन कौशल्यामुळे मंडळाच्या विविध उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. मंडळाच्या 75 वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर सुरू झालेल्या 76 व्या वर्षात सागर मणियार यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिक जोमाने सामाजिक कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवीन कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. यंदा 12 दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत सहा दिवसांचा ‘संगमनेर फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबविण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी मंडळाचे सभासद अनीश मणियार, मधुसूदन नवंदर, सम्राट भंडारी आणि सुदर्शन नावंदर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून आगामी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे राजस्थान युवक मंडळाच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून मंडळाच्या आगामी वाटचालीबाबत सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे



