लोणी(जनता आवाज वृत्तसेवा) :- राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील प्रवरा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूउपशावर लोणी पोलिसांनी धडक कारवाई करत जेसीबी मशीन, डंपर, ट्रॅक्टर आणि वाळूसह ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. १६) सकाळी सहाच्या सुमारास पाथरे बुद्रुक येथील प्रवरा नदीपात्रालगत अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी तेथून पळ काढला. मात्र तपासात मिनिनाथ संजय घोलप, संकेत संतोष क्षिरसाठ, राहुल दत्तात्रय दिघे, जयेश शिवप्रसाद पांडे, सार्थक दत्तात्रय हुलवन, विशाल संजय पिंपळे आणि प्रशांत सुनिल घोलप यांच्यासह अन्य साथीदारांनी संगनमत करून कोणतीही शासकीय परवानगी न घेता प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा केल्याचे समोर आले.
या कारवाईत २० लाख रुपये किमतीचे जेसीबी मशीन, १५ लाख रुपये किमतीचा डंपर, ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि डंपरमध्ये भरलेली दोन ब्रास वाळू असा एकूण ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळूउपशामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२), ३ (५) तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बीएनएसएस कलम ३५ (३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल धादवड करीत आहेत.
धडक कारवाईमुळे वाळूमाफियांना चाप
प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून या कारवाईमुळे वाळूचोरी करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टर जप्त झाल्याने परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.



