नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा):- भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला २४ तासांची मुदत दिली. अन्यथा नेवासा येथे येऊन आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
खोलेश्वर गणपती मंदिराजवळ शेटे यांच्यावर जमावाने केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी भेट देऊन सोमय्या यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तपासाबाबत माहिती घेतली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, ऋषिकेश शेटे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासोबत चर्चा झाली.
दरम्यान, सोमय्या यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पैस खांबाचे दर्शन घेतले. श्रावण मासातील श्रीकृष्ण जयंती व संत ज्ञानेश्वर महाराज जयंतीनिमित्त सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या. परकीय शक्तींपासून देश सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रभक्ती जागविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने सोमय्या यांचा सन्मान करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत निवेदन देण्यात आले. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन सोमय्या यांनी दिले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भाजपा मंडलाध्यक्ष मनोज पारखे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेश नवले, ज्ञानेश्वर पेचे, निरंजन डहाळे, सतीश कर्डीले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुन्हा रस्त्यावर हातगाड्यांचे अतिक्रमण नको!
जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांच्या हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता बांधकाम विभाग व नगरपंचायत प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना डॉ. किरीट सोमय्या यांनी केली.




Total Users : 624914