spot_img
spot_img

१८ वर्षांपूर्वीच विवाह; चार अल्पवयीन माता गर्भवती उपजिल्हा रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक प्रकार उघड; 

पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):- पाथर्डी तालुक्यात बालविवाहाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विवाह झाल्यानंतर गर्भवती राहिलेल्या चार अल्पवयीन मातांची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील नियमित आरोग्य तपासणीदरम्यान उघडकीस आली आहे. शहरासह तालुक्यातील तीन गावांमध्ये प्रत्येकी एक अशा चार अल्पवयीन गर्भवती माता आढळून आल्या आहेत. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, बालविवाह प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या ग्रामस्तरीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने दर शनिवारी गरोदर मातांची नियमित तपासणी केली जाते. त्यानुसार शनिवारी झालेल्या तपासणीदरम्यान काही गर्भवती मातांच्या वयाबाबत संशय निर्माण झाला. कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली असता चार माता १८ वर्षांखालील असल्याचे समोर आले.यातील एका अल्पवयीन गर्भवतीने आपले वय लपविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. तिने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आधारकार्ड सादर केले. मात्र, कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणीतील माहितीमध्ये विसंगती आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुसऱ्या एका प्रकरणात सध्या आधारकार्डवर संबंधित महिलेचे वय १८ वर्षे असल्याचे दिसत असले, तरी ती गर्भवती राहिली त्यावेळी तिचे वय अवघे १७ वर्षे असल्याची माहिती तपासणीत समोर आली. अशाच स्वरूपाची माहिती अन्य दोन प्रकरणांतही पुढे आली आहे.

चारही प्रकरणांची माहिती समोर आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने याबाबतचा सविस्तर अहवाल पोलिस प्रशासनाकडे पाठविला आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली आहे. या बालविवाहांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विवाह नेमके कधी व कोठे झाले, विवाहाच्या वेळी मुलींचे वय किती होते, तसेच विवाहासाठी कोणाची भूमिका होती, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

दर शनिवारी नियमितपणे गरोदर मातांची आरोग्य तपासणी केली जाते. आजच्या तपासणीत १८ वर्षांखालील चार माता आढळून आल्या आहेत. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सचिन दरंदले यांनी दिली.पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाकडून माहिती प्राप्त झाली असून, त्याची नोंद घेण्यात आली आहे. याबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर यांच्याकडे देण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांनी दिली.

या प्रकरणातील एका मुलीने आधारकार्डच्या माध्यमातून वय लपविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे खरी आहेत का, त्यातील जन्मतारीख योग्य आहे का, याचीही पडताळणी तपास यंत्रणेकडून केली जाणार आहे. अल्पवयीन मुलींचे विवाह लपविण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार अथवा चुकीची माहिती देण्यात आली आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.चार प्रकरणांमागील नेमके वास्तव पोलिस तपासातून समोर येणार आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!