कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार बुद्रुक ‘माझे गाव–माझी जबाबदारी’ आणि ‘स्वच्छ कोल्हार –सुंदर कोल्हार ’ या संकल्पनेला मुहूर्त रूप देत ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुक व कोल्हार भगवतीपुर व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७ सप्टेंबर) भव्य गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ६.३० वाजता ‘आम्ही कोल्हारकर ’ सेल्फी पॉईंटजवळून या अभियानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली.
कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे पाटील, कोल्हार भगवतीपुर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित मोरे, उपाध्यक्ष अतुल रांका, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंगवी, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाचे (ओम शांती) शिवाजीभाई शेजुळ (आप्पा), विद्यालयाच्या संचालिका स्वातीबहन, पद्मावतीबहन, ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम हिरानंदानी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः हातात झाडू, फावडे व कचरा संकलनाच्या पिशव्या घेत स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
या अभियानांतर्गत स्टेट बँक परिसर, बेलापूर रोड, बी. एम. स्वीट्स परिसर तसेच एचडीएफसी बँकेसमोरील ओपन जिम परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसरातील कचरा संकलित करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
गावाची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, या भावनेतून सुमारे १०० नागरिक, व्यापारी, युवक तसेच महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत अभियानाला व्यापक स्वरूप दिले. नागरिकांच्या एकजुटीतून ‘स्वच्छ गाव–सुंदर गाव’ या संकल्पनेला बळ मिळाले.
आगामी नवरात्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर भगवती माता मंदिर परिसर तसेच बाजारतळ परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प अॅड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत केवळ एका दिवसापुरते अभियान मर्यादित न ठेवता दर आठवड्याला गावातील ठराविक परिसरात सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प केला.
नागरिकांच्या सामूहिक सहभागातून सुरू झालेली ही स्वच्छतेची चळवळ कोल्हार बुद्रुकला अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनविण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी जयशंकर क्लॉथचे संचालक अनिल हिरानंदानी, महेश फलटणे, योगेश कोळपकर, संदीप लोखंडे, आनंद रांका,बापू कुंभकर्ण, नाथा शिंदे, निलेश मोहाडकर, देडगांवकर सराफचे संचालक रोहित देडगांवकर, मुद्रा मेन्सचे संचालक प्रदीप खर्डे, स्वप्नील मोरे, विकी डंक,अजिंक्य मोरे, प्रसाद दळवी, महेश शेळके, सुनील नेहे, सुनील लबडे, अजय पठारे, सोनू सिंह, बीएम स्वीट संचालक भागाशेठ, निलेश शिंगवी, प्रकाश पटेल, पत्रकार गणेश सोमवंशी, बापू दळवी, चेतन गांधी, दत्ता घुले, गव्हर्नमेंट ऑडिटर दिगंबर केदारसाहेब, किरण तांबे यांच्यासह अनेक मान्यवर व कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे कर्मचारी सफाई कर्मचारी यांचे सहयोग लाभले.




Total Users : 648921