श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला १ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दत्तात्रय खेमनर याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
‘आरपीआय’च्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील मागणीचे निवेदन सादर केले. या प्रसंगी भीमराज बागुल, जिल्हा सरचिटणीस संजय बनसोडे, शहराध्यक्ष पप्पू इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात आरपीआयने म्हटले आहे की, फत्याबाद येथे शासकीय निधीतून स्मशानभूमीमध्ये मुरमाचा भराव टाकण्याचे काम सुरू असताना दत्तात्रय पोपट खेमनर याने तिथे येऊन महिला ग्रामसेविकेला अश्लील शिवीगाळ करून अपमानित केले. तसेच त्यांच्या अंगावर धावून जात धक्का देऊन त्यांना खाली पाडले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर शासकीय कर्मचाऱ्यांनाही त्याने शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणामध्ये ग्रामसेविकेकडे दत्तात्रय खेमनर याने १ लाख रुपयांची खंडणी मागितली होती आणि ती न दिल्यास सदर काम होऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. आरोपीने ग्रामसेविकेकडून १ हजार १०० रुपये ‘फोनपे’च्या माध्यमातून स्वीकारले देखील आहेत, याकडे निवेदनाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष वेधण्यात आले आहे.
दत्तात्रय खेमनर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असून, त्याच्यावर यापूर्वीही गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. सदर व्यक्ती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक धमकी देणे, बदनाम करणे व ब्लॅकमेल करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. महिला ग्रामसेविकेला मारहाण आणि धमकी देण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने, त्याच्यावर तात्काळ ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई प्रशासनाने करावी, अशी मागणी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
अशाच पद्धतीचे निवेदन राहाता पोलीस ठाण्यातही देण्यात आले असून, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन दत्तात्रय खेमनर याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, नेवासा येथेही तहसीलदारांना निवेदन देऊन अशाच पद्धतीने कडक कारवाई करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.




Total Users : 653510