राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी तालुक्यात अत्यंत महत्त्वाच्या गणल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच गावोगावी रणधुमाळी सुरू झाली असून ” फिल्डींग ” लावण्यात “गावपुढारी “गुंतले आहेत.
येत्या ५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतची निवडणुकीत सत्ता आपल्याच मर्जीतील माणसाच्या ताब्यात ठेवण्यासाठी पॅनल तयार करणे उमेदवाराची जुळवा जुळव करणे मागील काही कारणावरून झालेले रुसवे फुगे दूर करून गाव पातळीवर एकोपा तयार करण्यासाठी गुप्त बैठकांची लगबग सुरू केली आहे. त्यामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गाव पुढाऱ्यांची उमेदवारांची चाचपणी करताना चांगलीच दमछाक होत आहे.
येत्या १६ ऑक्टोबर रोजी अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार असून कोणते उमेदवार किती अर्ज नेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अर्ज विक्रीच्या दिवशीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गाव पातळीवर खवय्या मतदारांची चांगलीच चंगळ सुरू झाली आहे. गावागावात व परिसरातील हॉटेल व धाब्यावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे तरुण मतदार कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी रंगीत संगीत पार्ट्यांना उधाण आले असले तरी खरे चित्र हे ५ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे असल्याची चर्चा गावोगावी मोठ्या चर्चिली जात आहे.
या पंचवार्षिक निवडणुकीत काही ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर तर काही ग्रामपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांचे सत्ता राहील तर कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी अशा लढती होणार असून कोण कुठे बाजी मारणार यासाठी आता पासूनच पैजा लागल्या आहेत मात्र हे सर्व चित्र गुलदस्त्यात आहे.



