राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):-शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करावा यासाठी अशी प्रात्यक्षिके ही महत्त्वपूर्ण असतात. या माध्यमातून आपल्याला जे चांगले अनुभव आलेले आहेत ते अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगण्याचे काम करावे. उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज आहे या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचा वापर करा असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरचे पीक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दवंगे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांचे माध्यमातून राहाता तालुक्यातील दहेगाव कोऱ्हाळे येथे नुकतेच सोयाबीन पिकावर कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी तेलबिया आणि कडधान्य पिकांवर समूह पीक प्रात्यक्षिक राबविण्यात येते. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून दहेगाव कोऱ्हाळे येथे सोयाबीन पिकावर पीक प्रात्यक्षिके राबविण्यात आली होती. त्या अनुषंगाने या गावामध्ये सोयाबीनवर कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दवंगे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पीक प्रात्यक्षिकाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच सोयाबीन पिकावरील लष्करी अळी आणि शेंगांवरील काळे डाग यांच्या नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच संदीप डांगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि गावामध्ये प्रात्यक्षिकाचे आयोजन काटेकोरपणे सर्व शेतकऱ्यांनी केल्याची माहिती दिली. यावेळी दहेगाव गावचे रामा डांगे, सुभाषराव डांगे, बापूसाहेब डांगे, ज्ञानेश्वर डांगे आणि शेतकरी उपस्थित होते.
उपस्थित शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावरील विविध शंकांचे यावेळी निरसन करून घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी रामा डांगे यांनी सर्वांचे आभार मानले.