अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- जिल्हा परिषद कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृषीपर्व २०२६’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिषदेत वाकडी (ता. राहाता) येथील महिला शेतकरी ज्योती कैलास लहारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ निमित्त शेती क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पारंपरिक शेतीपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनवाढ, पशुसंवर्धन आणि शाश्वत शेतीवर भर देणारे उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
यावेळी मान्यवरांनी, महिला शेतकऱ्यांसाठी ज्योती लहारे या आदर्श ठरत असून त्यांचे कार्य ग्रामीण कृषी विकासाला नवी दिशा देणारे असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या यशामुळे शेती क्षेत्रातील महिलांचा आत्मविश्वास वाढत असून नव्या पिढीसाठी ते प्रेरणास्थान ठरत असल्याचेही नमूद करण्यात आले.
‘कृषीपर्व २०२६’च्या निमित्ताने झालेला हा सन्मान महिला शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची व्यापक पातळीवर झालेली दखल असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



