पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील घुमटवाडी परिसरात असलेल्या गहिनीनाथ देवस्थानाजवळ आढळलेल्या संशयास्पद खड्ड्यामुळे रविवारी संपूर्ण परिसरात भीती आणि अफवांचे वातावरण निर्माण झाले. या खड्ड्यात नरबळी देऊन एखाद्याला पुरण्यात आले असावे, अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र पोलिसांनी सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा उकरून तपासणी केली असता कोणत्याही प्रकारचे मानवी अवशेष किंवा संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने अखेर या अफवांना पूर्णविराम मिळाला. मात्र त्या ठिकाणी करणी कांडाचे पूजेचे साहित्य आढळून आले.
घुमटवाडी गावापासून सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर डोंगरपायथ्याशी वसलेले गहिनीनाथ देवस्थान हे नाथ संप्रदायाचे प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. या ठिकाणाशी संबंधित अनेक आख्यायिका प्रचलित असून येथे एक भुयार असल्याचे सांगितले जाते. हे भुयार मायंबा येथील मच्छिंद्रनाथ आणि श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानाशी जोडलेले असल्याची ग्रामस्थांमध्ये समजूत आहे. तथापि, हा भुयार मार्ग अनेक वर्षांपासून बंद आहे.
गावकऱ्यांच्या मते, या परिसरात गुप्तधन पुरले असल्याचे अनेक ग्रामस्थ जुन्या काळापासून सांगत आले आहेत. त्यामुळे काही अनोळखी व्यक्ती रात्रीच्या वेळी येथे येऊन संशयास्पद हालचाली करत असल्याच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत. शुक्रवारी व शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सुमारे तीन फूट रुंद आणि सहा फूट खोल खड्डा खोदून पुन्हा तो बुजवून टाकल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे खड्ड्याचा आकार कबरीसारखा असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या घटनेनंतर धनाच्या लालसेपोटी नरबळी देण्यात आला असावा अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली. संतप्त व घाबरलेल्या ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा उकरून तपास केला.
तपासादरम्यान खड्ड्यात कोणतेही मानवी अवशेष किंवा संशयास्पद बाबी आढळून आल्या नाहीत. मात्र खड्ड्याच्या वरती लिंबू, गुलाल, नारळ, हार, बाहुली अशा पूजासाहित्याचा अवशेष आढळल्याने येथे काहीतरी अंधश्रद्धाजन्य कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गहिनीनाथ मंदिराजवळच महाकालेश्वर मंदिर असून त्याच परिसरात असलेल्या भुयाराजवळ हा खड्डा खोदण्यात आला होता. खड्डा खोदून पुन्हा माती टाकून बुजवण्यात आल्याने संशय अधिकच बळावला होता.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक साहेबराव चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नसून पाथर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.दरम्यान, या घटनेमुळे घुमटवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अफवांना आळा बसला असला, तरी अंधश्रद्धा आणि गुप्तधनाच्या अफवांमुळे अशा घटना घडत असून या झालेला प्रकाराचा पोलिसांनी छडा लावावा अशी मागणी घुमटवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे
.



