शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा) :- प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचे रूपांतर अत्याचार, मारहाण आणि धर्मांतरासाठी दबाव अशा गंभीर आरोपांमध्ये झाल्याची धक्कादायक घटना शिर्डीत उघडकीस आली आहे. ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी हमीद पठाण या संशयिताला अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या जबाबानुसार, ती संगमनेर येथे मार्केटिंगचे काम करत असताना हमीद पठाण याच्याशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि दोघे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू लागले. या नात्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर तरुणी घर सोडून आरोपीसोबत राहू लागली.
दोघे काही काळ छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होते. त्या काळात नोटरीद्वारे एकत्र राहण्याचा करार केल्याचेही तिने सांगितले. पुढे ते शिर्डीत परतल्यानंतर आरोपीचे वर्तन बदलल्याचा आरोप आहे. बाहेर जाण्यास मनाई, पारंपरिक वेशभूषा टाळण्यास सांगणे, बुरखा परिधान करण्यास भाग पाडणे अशा गोष्टींवरून वाद होत होते. विरोध केल्यास मारहाण केली जात असल्याचेही पीडितेने म्हटले आहे.
तसेच, मांसाहार करण्यास भाग पाडणे, संशय घेऊन त्रास देणे, तसेच जुगाराच्या सवयीमुळे आर्थिक तणाव निर्माण होणे, या कारणांनी गेल्या दोन-तीन वर्षांत वारंवार वाद झाले. या काळात त्यांना अपत्यही झाले आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या वादात आरोपीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पीडित तरुणीने समाज माध्यमांद्वारे मदतीचा धाव घेतल्याचे समोर आले आहे. भाजप कार्यकर्ता योगेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, पीडितेने संपर्क साधल्यानंतर तिला पोलिसांची मदत मिळवून देण्यात आली. तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली.
या घटनेनंतर विविध संघटनांनी संताप व्यक्त केला असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.



