spot_img
spot_img

मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग राज्य सरकारविरोधात मनोज जरांगेंचा इशारा

जालना( जनता आवाज वृत्तसेवा ) :-  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल, शुक्रवारी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी पुन्हा एकदा एक मोठे आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाची तारीख ते 16 मे रोजी आंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत घोषित करणार आहे. या सरकारला कितीही मायेने बोलले, तरी ते आपले अश्रू पुसणार नाही. त्यामुळे त्याला दयामाया न दाखवता आंदोलन केले, तरच न्याय पदरात पडेल, असे ते आपल्या आगामी आंदोलनाची माहिती देताना म्हणालेत.

मनोज जरांगे काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी मराठा समाजाला पूर्वीपासूनच एकजुटीने राहण्याचे आवाहन करत आहे. तुम्ही या सरकारला असे कितीही पोटतिडकीने सांगितले, कितीही मायेने सांगितले तरी, ते कधीही आपल्या डोळ्यांचे अश्रू पुसणार नाही. तुम्हाला आंदोलनाच्या पवित्र्यात यावे लागेल, पण कट्टरतेने यावे लागणार आहे. तुम्हाला सरकारची किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाची दयामाया दाखवता येणार नाही. असे झाले तरच न्याय पदरात पडू शकतो, अन्यथा नाही.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याजाचा परतावा मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण उद्योजक आर्थिक अडचणीत सापडलेत. जरांगे यांनी यावरही भाष्य केले. ते म्हणाले, आपण 16 मे रोजी पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. याविषयी आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या तरुणांचे सिबिल खराब होत आहे. ते कर्जबाजारी होत आहेत. त्याचे मूळ कारण सरकार आहे. त्यामुळे सारथीपासून अण्णासाहेब पाटील महामंडळापर्यंत, तसेच हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यापर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली. पण कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाही. आता जूनमध्ये मराठा समाजाच्या मुलांचे प्रवेश आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र हवे आहे. पण सरकार ते जाणिवपूर्वक देत नाही. सातारा संस्थानचे गॅझेटिअर का निघत नाही? गुन्हे अद्याप मागे का घेतले नाही?

बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना एमआयडीसीत नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. तो जीआर निघाला नाही. विद्युतचा जीआर निघाला नाही. बलिदान दिलेल्या अनेक कुटुंबांना निधी मिळाला नाही. म्हणजे तुम्ही आमच्या मेलेल्या बांधवांचेही राजकारण करत आहात. याला मुख्यमंत्री म्हटले जाते का. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर एक घाव घालून फायनल तुकडा पाडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या राज्यात खूप मोठे आंदोलन उभे राहणार आहे. त्याची तारीख आंतरवाली सराटीत जाहीर केली जाईल, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

आपण या राज्यात खूप मोठे आंदोलन उभे करणार आहोत. त्याची तारीख 16 तारखेला घोषित केली जाईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व व्यवस्थापकीय संचालक यांच्यातील वादाची आतली गोष्ट मला माहिती नाही. पण कोण अध्यक्ष, कोण एमडी यापेक्षा या गोष्टीला सर्वस्वी सरकार जबाबदार असते. त्यांना अधिकार हे सरकार देते आणि सरकारलाच कामे होऊ द्यायची नाही. सरकारची हीच भूमिका आहे. हे डावपेच या दोघांनीही ओळखले पाहिजेत. पण यात मराठा समाजाचे वाटोळे होत आहे. तो भरडला जात आहे.

– मनोज जरांगे पाटील

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!