संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- खाडगाव परिसरात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एक पिकअप वाहन आणि एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, अमृत आढाव, योगेश कर्डिले तसेच चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दि. २० मे रोजी रात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, खाडगाव येथील शरद कारभारी गुंजाळ हा आपल्या हस्तकांमार्फत नाशिक रोडकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने अवैधरित्या वाळूची वाहतूक करत आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने खाडगाव फुलाजवळ सापळा रचला. काही वेळात संशयित पिकअप वाहन येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत चालकाने आपले नाव शुभम संजय जेडगुले (वय २५, रा. वेल्हाळे, ता. संगमनेर) असे सांगितले. तसेच पिकअप वाहनाचे मालक शरद कारभारी गुंजाळ (रा. खाडगाव, ता. संगमनेर) असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी आरोपींकडून १० हजार रुपयांची एक ब्रास वाळू आणि ३ लाख रुपयांचा मॅक्स कंपनीचा पिकअप असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी संगमनेर सिटी पोलीस ठाण्यात गु.र. नं. ४३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.



