अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने व्यापक मोहीम राबवत दोन दिवसांत ११ ठिकाणी धाडसत्र चालविले. या कारवाईत १० अवैध दारू विक्रेत्यांसह एका जुगार अड्ड्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल ७६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २४ आणि २५ मे दरम्यान जिल्ह्यातील विविध भागांत गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी केली.
श्रीगोंदा, कोपरगाव तालुका, नेवासा, बेलवंडी, राहुरी आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री केंद्रांसह जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ११ ठिकाणी छापे टाकून विविध प्रकारचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस ठाणेनिहाय कारवाईमध्ये श्रीगोंदा येथे तीन गुन्ह्यांत ६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोणी येथे तीन कारवायांत २ हजार ९६० रुपये, राहुरी येथे दोन कारवायांत ७ हजार ५०० रुपये, बेलवंडी येथे ३७ हजार ७३५ रुपये, कोपरगाव तालुक्यात २० हजार २५५ रुपये तर नेवासा येथे जुगार अड्ड्यावर कारवाई करत १ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध धंद्यांविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.




Total Users : 614306