spot_img
spot_img

महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात कंत्राटी कर्मचाऱ्याची तीक्ष्ण हत्याराने हत्या

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात काल सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी कैलास पोपट दोंदे , वय 26(रा. गोटुंबे आखाडा) याची हत्या झाल्याचे निदर्शनास आले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यापीठाच्या कॉटन तळे परिसरात कैलास दौंदे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा आणि प्राथमिक तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, दारकुंडे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, घटनेचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हत्या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. फॉरेन्सिक अहवाल आणि प्राथमिक तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरासह राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. सोनई फाटा ते गोटुंबे आखाडा या मार्गावर शनिशिंगणापूरला जाणारे भाविक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स नियमितपणे थांबत असतात. या परिसरात काही युवकांकडून प्रवाशांना त्रास दिला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे या भागात पोलीस प्रशासनाने नियमित पेट्रोलिंग वाढवावे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अलीकडील घटनेच्या पार्श्वभूमीवर या मागणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!