spot_img
spot_img

शिर्डीत एफडीएची मोठी धाड ६०० किलो संशयित पेढे जप्त, निकृष्ट साठा नष्ट

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी मोठी कारवाई करत शिर्डीतील पेढा उत्पादन केंद्रे आणि प्रसादासाठी पेढे विक्री करणाऱ्या दुकानांवर धाड टाकली. या कारवाईत सुमारे ६०० किलो संशयित व निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त करण्यात आले, तर नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले. उर्वरित साठा शिर्डी नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर नेऊन नष्ट करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन, दुग्ध विकास विभाग आणि वजनमापे निरीक्षक विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत विक्री होणाऱ्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्या होत्या. काही ठिकाणी अतिसाखरयुक्त, निकृष्ट दर्जाचे तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून तयार करण्यात येणारे पेढे भाविकांना विकले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर काही दुकानांमधून नमुने संकलित करण्यात आले होते. या प्राथमिक तपासणीनंतर व्यापक तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी सकाळपासून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीतील प्रमुख पेढा उत्पादन केंद्रे आणि विक्री आस्थापनांची तपासणी सुरू केली. मते, गोंदकर आणि जाधव यांच्याशी संबंधित उत्पादन केंद्रांमध्ये पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी उत्पादन प्रक्रिया अस्वच्छ वातावरणात सुरू असल्याचे निदर्शनास आले. अन्नपदार्थांच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता आणि सुरक्षा निकषांचे पालन होत नसल्याचेही आढळून आले.

पथकाने संशयित पेढ्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी सीलबंद केले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, वजनमापे निरीक्षक विभागानेही स्वतंत्र तपासणी केली. काही ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या वजनकाट्यांची नोंदणी नसल्याचे तसेच वजनात तफावत असल्याचे आढळून आले. ग्राहकांची फसवणूक होणार नाही यासाठी संबंधित व्यावसायिकांविरोधात दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या सुमारे ६०० किलो संशयित पेढ्यांपैकी आवश्यक नमुने तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले. उर्वरित साठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिर्डी नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर नेऊन नष्ट करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे पंचनामेही करण्यात आले.

साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. दर्शनानंतर प्रसाद म्हणून पेढे खरेदी करण्याची परंपरा असल्याने येथील मिठाई व्यवसायाची उलाढाल मोठी आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे शिर्डीतील पेढा उत्पादक आणि मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी तपासणी सुरू असल्याची माहिती मिळताच व्यावसायिकांमध्ये धावपळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून, हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सचिवपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळविरोधी मोहिमेला वेग आला आहे. शिर्डीतील ही कारवाई त्याच मोहिमेचा भाग मानली जात असून, धार्मिक स्थळांवरील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!