spot_img
spot_img

नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी क्रांतीदिनी महामार्गावर चक्काजाम

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- नाशिक – पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली असून ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता पुणे – नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे कोणत्याही पक्षाचे किंवा एखाद्या राजकीय नेत्याचे आंदोलन नसून, भावी पिढ्यांच्या हितासाठी उभारलेले जनआंदोलन आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.

‘शंभर वर्षांतून एकदाच अशी संधी मिळते’

आमदार तांबे म्हणाले, “रेल्वेसारखे मोठे विकास प्रकल्प शंभर वर्षांतून एकदाच साकार होतात. आज हा प्रकल्प आपल्या भागातून निघून गेला, तर पुढील शंभर – दोनशे वर्षांत अशी रेल्वे पुन्हा या भागात येईल, याची कोणतीही खात्री नाही.किंबहुना, अशी संधी पुन्हा मिळणारही नाही. त्यामुळे हा प्रकल्प आपल्या भागातूनच मार्गी लागला पाहिजे.”

‘संघर्ष आता अंतिम टप्प्यात’

पुणे – नाशिक सरळ रेल्वेमार्गासाठीचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, ” एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला या भागातील जनतेच्या अपेक्षा अजूनही कायम आहेत. सरकार जनभावनेचा आदर करून नफा-तोट्याचा विचार बाजूला ठेवत व्यवहार्य मार्ग काढेल अशी आमची अपेक्षा आहे.”

केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निर्णायक आंदोलन

” केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आणि या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण पुणे – नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी,” असे आवाहन त्यांनी केले.

वाहतुकीचा वाढता ताण; रेल्वेच ठरेल पर्याय

सध्या पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत असून, दोन – अडीच तासांचा प्रवास करण्यासाठी सहा – सहा तास खर्च करावे लागत आहेत. रस्त्यांची अवस्थाही अनेक ठिकाणी खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे तांबे यांनी सांगितले.

मधल्या शहरांसह पुणे – नाशिकलाही मोठा दिलासा

या परिसरातील हजारो युवक – युवती नोकरी, शिक्षण, उद्योग – व्यवसाय आणि इतर कामांसाठी पुणे व नाशिक येथे ये-जा करतात. त्यामुळे दोन्ही शहरांवरही लोकसंख्येचा आणि वाहतुकीचा मोठा ताण वाढत आहे. सरळ रेल्वेमार्ग झाल्यास सिन्नर, संगमनेर, खेड, नारायणगाव, जुन्नर, मंचर, चाकण यांसह पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांनाही मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘क्रांतीदिनी रस्त्यावर उतरूया’

“आता क्रांती करण्याची वेळ आली आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता जिथे शक्य असेल, तेथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करावे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी संपूर्ण पुणे-नाशिक महामार्ग ठप्प करून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे तांबे यांनी स्पष्ट केले.

‘हे आंदोलन भावी पिढ्यांसाठी’

जेव्हा जनता एकत्र येते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो. त्यामुळे हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली किंवा कोणत्याही नेत्याच्या नेतृत्वाखाली होणार नाही. सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाने यात सहभागी व्हावे. हे आंदोलन कुणा एका व्यक्तीचे नसून भावी पिढ्यांच्या विकासासाठी आजची पिढी उभारत असलेले ऐतिहासिक जनआंदोलन आहे.

आ.सत्यजित तांबे

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!