अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- संवेदनशील गुन्ह्यातील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खोटी आणि खातरजमा न केलेली बातमी प्रसारित करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी दोन यूट्यूब न्यूज चॅनेलविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ‘NEWS TODAY 24′ आणि ‘ZERO NEWS’ या यूट्यूब चॅनेलवरील संबंधित बातमीदार व संपादकांनी कोणतीही खातरजमा न करता भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील जखमी धीरज कचरुसिंग परदेशी (रा. माधवबाग, भिंगार) यांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारित केली.
या बातमीमुळे अहिल्यानगर शहरात भीतीचे वातावरण निर्माण होण्याची तसेच सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७५/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३ (१), ३५३ (२) आणि २९२ अन्वये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले करीत आहेत.
संवेदनशील घटनांबाबत कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची खातरजमा करणे आवश्यक असून, चुकीच्या बातम्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




Total Users : 610092