लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):- टाळ –मृदंगाचा निनाद,मुखी विठ्ठलाचे नाम आणि पंढरीच्या ओढीने पुढे पडणारी वारकऱ्यांची पाऊले अशा भक्तिमय वातावरणात लोणी बुद्रुक येथून संत महिपती महाराज देवस्थान, ताहाराबादकडे निघाली भाविकांची पायी दिंडी प्रस्थान झाली आहे .
आषाढी वारी नंतर गोपालकाल्याला धाकट्या एकादशीला पांडुरंग श्री क्षेत्र ताहाराबाद येथे येऊन वारकऱ्यांना दर्शन देत असतात. म्हणून दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातून असंख्य दिंड्या धाकट्या एकादशीला ताहाराबाद कडे येत असतात.
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरु केलेली ही पायी दिंडी आज पर्यंत सुरू आहे. या वर्षी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या वतीने लोणी बुद्रुक येथुन दिंडीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.
ही पायी दिंडी सकाळी लोणी बुद्रुक येथुन निघाली व पाथरे, सोनगाव, डुक्रेवाडी येथे दुपारचे महाप्रसाद घेत कानडगाव,वरशिंदे मार्गे श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे पोहचली. या पायी दिंडी सोहळा चालु असताना वरुणराजा अधून मधून भक्तांवर आशिर्वाद रुपी पावसाच्या सरी बरसवत होता. जणुकाही पांडुरंगरुपी निसर्गही भक्तांच्या स्वागताला हजर होता. रस्त्याच्या कडेने हिरवेगार शालू लपेटलेले डोंगर आणि त्या डोंगराच्या घाटामधून हे पायी वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत ताहाराबाद येथे पोहचले. दिंडी मार्गात ठिकठिकाणी चहा नाष्टा ची सोय स्थानिक नागरिकांनी केली होती. दुपारचे महाप्रसाद कार्यक्रम ओम गागरे यांनी त्यांच्या वस्तीवर कानडगाव येथे झाला.
ही पायी दिंडी हभप भारत महाराज धावणे व हभप परसराम विखे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी बुद्रुक येथील युवकांनी पुढाकार घेत निर्विघ्न पार पाडली. विशेष म्हणजे या दिंडीत महिलांची संख्या लक्षणीय वाढलेली होती.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी लोणी बुद्रुकचे समस्थ ग्रामस्थ व युवकांनी मोलाचे सहकार्य केले. लोकनेते पद्मभूषण खा.बाळासाहेब विखे पाटील शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील यांनी वारकऱ्यांना येण्यासाठी बस दिल्या.तर रथासाठी पोपट विखे यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला आहे.




Total Users : 612197