spot_img
spot_img

नेवाशातील व्हीडीओ व्हायरल प्रकरणाची चौकशी करा मुख्यमंत्र्यांसह अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करणार; चित्रीकरणामागील हेतू तपासण्याची मागणी

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणावरून नेवासात घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास करून काही व्यक्तींना अटक केली आहे. मात्र, या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, हा व्हीडीओ नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने चित्रीत केला, याचा स्वतंत्रपणे तपास करण्यात यावा, अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी केली आहे.

घटना घडत असताना व्हीडीओ चित्रीकरण करणारी व्यक्ती नेमकी घटनास्थळी कशी उपस्थित होती, तसेच संबंधित व्यक्तीने कोणत्या ठिकाणाहून अथवा इमारतीवरून या घटनेचे चित्रीकरण केले, याचाही तपास होणे आवश्यक आहे, असे डॉ. अशरफी यांनी म्हटले आहे. घटनेत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे; मात्र या संपूर्ण घटनेमागे नेमके कोण आहे, याचाही शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते. नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनीही नागरिकांना शांततेचे आवाहन केले होते.

मात्र, पोलिसांच्या या आवाहनानंतरही ‘एका युट्यूबने त्याच्या नावाने असलेल्या सोशल मीडियावरील एका अकाउंटद्वारे व्हीडीओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप डॉ. अशरफी यांनी केला आहे. त्यानंतर त्याच व्हीडीओच्या आधारे बातमी तयार करून ती दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया आणि युट्यूबवर प्रसारित करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे व्हीडीओचे चित्रीकरण, प्रसारण आणि त्यामागील उद्देश यांचा तपास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणाबाबत नेवासा पोलिस, पोलिस अधीक्षक तसेच मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वीच तक्रार करण्यात आल्याचे डॉ. अशरफी यांनी सांगितले. मात्र, नेवासा पोलिसांकडून संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे तसेच अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करून नेवासा पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतही निवेदनात नमूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मान्यता नसतानाही बातम्या कशा प्रसिद्ध होतात?

नेवाशातील संबंधित युट्यूब चॅनेलला कोणतीही शासकीय मान्यता नसल्याचा दावा डॉ. अशरफी यांनी केला आहे. असे असतानाही संबंधितांकडून व्हीडीओ आणि बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वीही नेवासा तालुक्यात अशाच प्रकारचे वादग्रस्त व्हीडीओ प्रसारित केल्याची चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि व्हीडीओंची सायबर सेलमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. अशरफी यांनी केली. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र अद्याप कारवाई झालेली नसल्याने संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यासाठी पुन्हा तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!