वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा):- नागमठाण येथे पाणीप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान नागमठाण येथील गोदावरी नदीच्या पुलावर शुक्रवारी थरारक घटना घडली. महांकळवाडगाव येथील शेतकरी बाळासाहेब घोगरे यांनी संतप्त होऊन पुलावरून नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित शेतकरी व आंदोलकांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पकडून मागे खेचल्याने मोठा अनर्थ टळला.
वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नागमठाण पुलावर आंदोलन सुरू असून, गुरुवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नाशिक व अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष विधीज्ञ अजित काळे तसेच विरगाव पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
पाणी सोडण्याबाबत आश्वासक निर्णय होण्याची शक्यता नसल्याची भावना निर्माण झाल्यानंतर बाळासाहेब घोगरे यांनी संतापाच्या भरात पुलावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना वेळीच पकडून सुरक्षित स्थळी आणले. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.
या घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाणीप्रश्नी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.




Total Users : 664420