spot_img
spot_img

कोपरगावात महावितरणकडून वीजचोरांना १२ लाखांचा झटका ! १०९ जणांवर दंडात्मक कारवाई : दंडाची रक्कम न भरणाऱ्यावर फौजदारी गुन्हा

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा) :-  महावितरणच्या कोपरगाव उभविभागाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील १० वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात वीजचोरी विरोधात गत १ ऑगस्टपासून दिड महिन्याच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत घरगुती, व्यवसायिक तसेच शेतीपंपाचा वापर करणाऱ्या १०९ वीजचोरांवर महावीतरणकडून कारवाई करीत १२ लाख ६५ हजार ९३० इतक्या रक्कमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईतून वीज चोरांचे चांगले धाबे दणाणले आहे. दरम्यान रवंदे वीज उपकेंद्राअंतर्गत सर्वाधिक २५ जणांवर कारवाई करून साडेतीन लाखांच्यावर दंड आकारण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे आहेत. महावितरणाच्या कोपरगाव उभविभागाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील एकूण ५० गावे आहेत. तर शहर विभागाच्या अंतर्गत संपूर्ण कोपरगाव शहरासह ५ गावे आहेत. उर्वरित २४ गाव ही राहता कार्यलयाच्या अंतर्गत येतात. कोपरगाव ग्रामीण भागातील ५० गावांना वीज पुरवठा करण्यासाठी एकूण १० वीजउपकेंद्र आहेत. या उप केंद्राअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत होती. त्यामुळे अधिकृत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होताना अडचण निर्माण होऊन त्यांची गैरसोय होत होती. यातून ग्राहकांच्या खूप तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर कोपरगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड यांनी वीज चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वच १० उपकेंद्रातंर्गत येणाऱ्या गावामध्ये अधिकारी, कर्मचारी यांची विविध पथके तयार करून संपूर्ण दिड महिना धडक मोहीम राबविली. यातून अधिकृत मीटर असताना बायपास करून वीज चोरीबरोबरच अनधिकृतपणे आकडा टाकून मोठ्या प्रमाणात विजेची चोरी करणारे चोर पथकांच्या हाती लागले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडाची रक्कम वेळेत भरली नाही तर विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यात विशेष विजचोरी मोहीम राबविण्यात आली. तालुक्यातील विजहानी ही ४२ टक्क्यापेक्षा जास्त असल्याने बरेच फिडर जी गृप मध्ये आहे. त्यामुळे प्रामाणीकपणे विजबिल भरणार्‍या ग्राहकांना विनाकारण भारनियम सहन करावे लागत आहे. यापुढे विजचोरीची मोहीम अधिक तिव्र करणार असून ज्या वीज चोरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी दंडाची रक्कम वेळेत भरली नाही तर त्यांच्यावर विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत फौजदारी गुन्हा करणार आहे.

(लक्ष्मण राठोड, उपकार्यकारी अभियंता महावितरण, कोपरगाव)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!