spot_img
spot_img

कौशल्याधारित शिक्षणातून मिळणार रोजगाराच्या नव्या संधी – सौ. शालिनीताई विखे पाटील रोजगार महाकुंभात ५५ राष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग; पाच हजार युवकांची नोंदणी

शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा ):-कौशल्याधारित शिक्षण ही काळाची गरज असून, देशातील युवकांना कौशल्याच्या बळावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत . हे महत्त्वपूर्ण काम राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत करण्यात येत असून रोजगार महाकुंभ युवकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या कौशल्य, उद्योजकता विकास विभागाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अभियानाचे आयोजन उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे .

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश उगले, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, कार्यक्रम समन्वयक डॉ. अण्णासाहेब वराडे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने कौशल्य शिक्षण आणि रोजगार निर्मितीला सातत्याने प्राधान्य दिले असून,संस्थेचे अध्यक्ष मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरेतील तांत्रिक व अतांत्रिक शाखांतील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असून, प्रवरा शिक्षण संस्था कौशल्य प्रशिक्षण देण्यात अग्रस्थानी असल्याची माहीती सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी दिली.

आज विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. मात्र, या संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी आपल्या कौशल्याला योग्य दिशा देऊन रोजगारासाठी आवश्यक तयारी करणे गरजेचे आहे. प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यासाठी सातत्याने मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत असून राज्य शासनाच्या माध्यमातून उद्योगांना चालना दिली जात आहे. त्यामुळे नव्या कंपन्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला चालना मिळत आहे. संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या निबे ग्रुपच्या माध्यमातून शिर्डी व हरेगाव परिसरात सुमारे पाच हजार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नोकरीच्या संधी उपलब्ध होत असताना विद्यार्थ्यांनी पॅकेजपेक्षा अनुभव, कौशल्य, नेतृत्वगुण आणि आपली योग्यता सिद्ध करण्याला अधिक महत्त्व द्यावे. सुरुवातीचा अनुभव भविष्यातील करिअरला योग्य दिशा देतो. त्यामुळे उपलब्ध संधींचा सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकार करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न युवकांनी करावा, असे आवाहन सौ. विखे पाटील यांनी केले.

सहाय्यक आयुक्त योगेश उगले म्हणाले, राज्यभर रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून कौशल्याधारित शिक्षणातून रोजगार निर्मितीवर शासनाचा विशेष भर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ युवकांसाठी रोजगाराची नवी दारे खुली करणारा उपक्रम ठरत आहे. प्रवरेत आयोजित करण्यात आलेला हा रोजगार महाकुंभ राज्यातील युवकांना दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी रोजगार मेळाव्या बाबत सांगितले की, या रोजगार महाकुंभात ५५ राष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला असून पाच हजारांहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. आयटीआय, अभियांत्रिकी तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाले आहेत.

डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रवरा संस्थेच्या कौशल्याधारित शिक्षणातील योगदानाची माहिती दिली. संस्थेच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. तसेच विविध उपक्रमांतून महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून पाच हजारांहून अधिक युवकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना उद्योगविश्वाशी थेट जोडणारा हा उपक्रम ठरणारआहे.

या रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स, पुणे,पी.जी. टेक्नोप्लास्ट, सुपा एमआयडीसी,ल्युपीन फार्मा लि.,अजिंठा फार्मा लि,ध्रुव ट्रान्समिशन, संभाजीनगर यांच्यासह विविध ठिकाणच्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!