spot_img
spot_img

२४ ते २५ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’; नागरिकांनी सतर्क राहावे

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात दि. २४ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

मेघगर्जना, वीज चमकत असताना अथवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये तसेच वीजवाहक तारांपासून सुरक्षित अंतर राखावे. घराबाहेर पडताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा व लोखंडी वस्तूंशी संपर्क टाळावा.

मोकळ्या मैदानात, शेतात किंवा उंच ठिकाणी उभे राहणे टाळावे. विजेच्या खांब, ट्रान्सफॉर्मर, टॉवर, धातूचे कुंपण यापासून दूर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच घरावरील सैल पत्रे (होडिंग), झाडांच्या फांद्या यांची पडझड होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जमिनीवर बसताना गुडघे वाकवून डोके खाली ठेवावे आणि शक्यतो जमिनीशी थेट संपर्क कमी ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धरण, नदी, नाले परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर नियोजन करावे.

जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतमाल सुरक्षित ठेवावा.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस ठाणे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहिल्यानगर येथे दूरध्वनी क्रमांक १०७७, ०२४१-२३५६९४० व २३२३८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!