वाकडी (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगरवाडी व पंचक्रोशी येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या पावन प्रेरणेने सुरू होणाऱ्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी पूर्ण झाली असून,मागील एक महिन्यापासून सप्ताहस्थळी भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारणीसह विविध सुविध उपलब्ध झाल्या आहेत
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी पूर्ण झाली असून, ह. भ. प. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच गोदाधाम सरला बेटाचे मठाधीपती ह. भ. प. महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम, भाविकांच्या सुविधा, महाप्रसाद, सुरक्षा, आरोग्य, पार्किंग आदी सुविधा पूर्ण झाल्या आहे
श्रीक्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि संपूर्ण सप्ताह कमिटी हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत सज्ज झाले आहे.यंदाच्या सप्ताहात महाराष्ट्रासह विविध राज्यांतून सुमारे २५ ते ३० लाख भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
१८ ते २५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी सुमारे २०० एकर परिसरात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून तसेच विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सुविधांसाठी विविध व्यवस्था उभारण्यात येत आहेत.यंदाच्या सप्ताहातील मुख्य अखंड भजन मंडप तब्बल ३०० × २०० फूट आकाराचा उभारण्यात आला आहे. या भव्य मंडपात हजारो भाविकांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. महंत रामगिरीजी महाराज यांची राहुटी,देवघर, तसेच प्रमुख कीर्तन व प्रवचन सेवेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. अखंड भजन सेवेसाठी देखील स्वतंत्र स्टेज तयार करण्यात आले आहे.सप्ताह कालावधीत दररोज चार पहारे होणार असून, प्रत्येक पहाऱ्यासाठी सुमारे ३ हजार टाळकरी सहभागी होणार आहेत. अखंड भजन सेवेत हजारो टाळकऱ्यांचा सहभाग राहणार असून, टाळ-मृदुंगाच्या गजराने संपूर्ण सप्ताह परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे.
लाखो भाविकांसाठी भव्य स्वयंपाकगृह उभारण्यात उभारले असून, याच ठिकाणी महाप्रसादाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी ७५ डिझेल भट्ट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांकडून आणण्यात येणाऱ्या भाकरी सुरक्षितपणे साठवण्यासाठी स्वतंत्र मोठ्या आकाराचे स्टोअर रूम उभारण्यात येणार आहे.सप्ताह सुरू झाल्यानंतर सुमारे पाच दिवस दररोज आमटी-भाकरीचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात येणार आहे.यासाठी श्रीक्षेत्र धनगरवाडी पंचक्रोशीसह आसपासच्या गावांतील हजारो स्वयंसेवक सेवा देणार आहेत. तसेच पंगतीपर्यंत आमटी-भाकरी पोहोचवण्यासाठी सुमारे ३०० ते ४०० ट्रॅक्टरच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.भाविकांच्या स्वागतासाठी भव्य आकाराचा स्वागत कक्ष, तसेच आरोग्य सेवा केंद्र, पोलीस नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही निगराणी कक्ष उभारण्यात येत आहेत.
संपूर्ण सप्ताह परिसरात २०० ध्वनिक्षेपकांची ध्वनिव्यवस्था, ६०० दिव्यांची प्रकाशयोजना आणि अत्यावश्यक सेवांसाठी सहा जनरेटरची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच १०० × ३०० फूट आकाराची दोन भव्य कृषी प्रदर्शन दालने उभारण्यात येणार आहेत. कृषी, उद्योग, धार्मिक साहित्य, ग्रामीण उत्पादने तसेच विविध संस्था व विभागांचे मिळून ३०० हून अधिक स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी येवला, नांदगाव आणि धनगरवाडी पंचक्रोशीतील भाविकांकडून मांडे व पुरणपोळीचे भोजन देण्यात येणार आहे. एकादशीच्या दिवशी २५० क्विंटल साबुदाणा खिचडी, तर सांगतेच्या दिवशी ४५० क्विंटल बुंदी आणि ७०० क्विंटल चिवडा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहस्थळाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या सुविधांसाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे धनगरवाडी पंचक्रोशीतील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा
१७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सप्ताह काळात तब्बल १६८ तास अखंड भजन सेवा सुरू राहणार आहे.सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ९ ते ११ तसेच दुपारी २ ते ४ या वेळेत सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान मधील महाराज मंडळींचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दररोज दुपारी १ ते २ या वेळेत सुश्राव्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांसाठी सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत आमटी-भाकरीच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सप्ताह कालावधीत शेतकरी बांधवांसाठी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. एकादशी निमित्त सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत विशेष कीर्तन कार्यक्रम होणार आहे.तसेच मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत प.पू. महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष नियोजन करण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुका ग्रामीण पोलीस ठाणे, श्रीरामपूर शहर,राहाता तालुका ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत सप्ताह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 12 पोलिस अधिकारी,350 पुरुष, महिला पोलीस व होमगार्ड संरक्षणासाठी असणार आहे. रामगिरीजी महाराजांच्या संरक्षणासाठी नेमून दिलेले संरक्षण असणार आहे.गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुमारे २०० वर्षांची समृद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. सप्ताहाची सलग दोनदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे.सप्ताहात भक्ती, नामस्मरण आणि समाजप्रबोधनाचा हा अखंड वारसा आजही श्रद्धेने व भक्तिभावाने जपला जात आहे.भव्य मंडप उभारणीपासून ते लाखो भाविकांच्या सेवेसाठी आवश्यक प्रत्येक सुविधेची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, यंदाचा १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह अधिक भव्य, दिव्य, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी जय्यत तयारी झाली आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सुमारे चार ते पाच हजार दुचाकीस्वार एकत्र येत भगवा ध्वज दुचाकीस लावून सर्व नेवासा रोड येथील हरेगाव फाटा येथून श्रीरामपूर येथील मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दत्तनगर, वाकडी फाटा, यशवंतबाबा चौकी धनगरवाडी फाटा व सप्ताहस्थळ या भक्तिमार्गाने महंत रामगिरी महाराज यांची भव्य स्वागत रॅली काढणार आहे. या भक्ती रैली दरम्यान ठिकठिकाणी रामगिरी महाराजांचे स्वागत होणार आहे.




Total Users : 614505