spot_img
spot_img

नागपंचमीच्या दिवशी सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित करा – आ. विक्रम पाचपुते  ३० जून रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याची आ. विक्रम पाचपुते यांची मागणी

श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्रात दरवर्षी हजारो नागरिक, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी सर्पदंशाला बळी पडतात. या गंभीर सार्वजनिक आरोग्य प्रश्नावर ठोस पाऊल उचलत सर्पदंशाला महाराष्ट्रात ‘अधिसूचित आजार’  म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे.

या विषयावर आमदार पाचपुते यांनी ३० जून २०२६ रोजी महाराष्ट्र विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्पदंशाला अधिसूचित आजार करण्याबाबत शासन सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

उद्या नागपंचमीचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उद्याच सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केल्यास या निर्णयाला मोठा सामाजिक संदेश आणि व्यापक जनजागृतीचे स्वरूप मिळू शकते, असे पाचपुते यांनी म्हटले आहे.

राज्यात उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार दरवर्षी साधारणतः ५० ते ६० हजार सर्पदंशाच्या घटना नोंदवल्या जातात. मात्र ही केवळ अधिकृतरीत्या नोंद झालेली संख्या आहे. प्रत्यक्षात ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक सर्पदंशाच्या घटनांची शासनाच्या यंत्रणेकडे नोंदच होत नसल्याने वास्तविक संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

सर्पदंश अधिसूचित आजार झाल्यानंतर त्याच्या प्रकरणांची अनिवार्य व व्यवस्थित नोंदणी करण्याची व्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या भागात, कोणत्या कालावधीत सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे, उपचारासाठी किती वेळ लागतो, मृत्यूचे प्रमाण किती आहे आणि उपचारांमध्ये नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत याचा अधिक अचूक डेटा शासनाला उपलब्ध होऊ शकेल.

उपचारानंतरच्या परिणामांवर संशोधनाची मोठी गरज

सर्पदंशाचा विषय केवळ रुग्णाचा जीव वाचवण्यापुरता मर्यादित नाही. सर्पदंशानंतर तसेच Anti-Snake Venom (ASV) व इतर उपचारांनंतर रुग्णांच्या शरीरावर होणारे दीर्घकालीन परिणाम आणि दुष्परिणाम याबाबत पुरेशा प्रमाणात माहिती व संशोधन उपलब्ध होणे आवश्यक आहे.

सर्पदंशातून वाचलेल्या रुग्णांचे पुढे काय होते? त्यांच्या किडनी, मज्जासंस्था, स्नायू किंवा इतर अवयवांवर दीर्घकालीन परिणाम होतात का? उपचारानंतर पुनर्वसनाची गरज किती आहे? अशा अनेक बाबींवर महाराष्ट्रात व्यापक आणि दीर्घकालीन अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.

सर्पदंश अधिसूचित झाल्यानंतर उपलब्ध होणारा व्यापक आणि प्रमाणित डेटा अशा संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

“३० जून रोजी विधानसभेत मी हा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. उद्या नागपंचमी आहे. सर्पदंशाला अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी यापेक्षा अधिक समर्पक दिवस असू शकत नाही. नागपंचमीच्या दिवशी हा निर्णय झाला तर तो केवळ शासन निर्णय न राहता सर्पदंश प्रतिबंध, योग्य उपचार आणि जनजागृतीचा राज्यव्यापी संदेश बनेल.”

– आमदार विक्रम पाचपुते

“नोंद झाली तर डेटा मिळेल, डेटा मिळाला तर संशोधन होईल आणि संशोधन झाले तर उपचार अधिक प्रभावी होतील. सर्पदंशामुळे होणारे टाळता येण्याजोगे मृत्यू कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते,” असे पाचपुते यांनी नमूद केले.

सर्पदंश अधिसूचित झाल्यास अचूक नोंदणी, सर्पदंशाचे हॉटस्पॉट ओळखणे, उपचार व्यवस्थेचे नियोजन, Anti-Snake Venom उपलब्धतेचे नियोजन, उपचारानंतरच्या परिणामांचा अभ्यास आणि संशोधन या सर्व बाबींना चालना मिळू शकते.

“नागपंचमीच्या दिवशी सर्पदंशाला अधिसूचित आजार घोषित करून महाराष्ट्राने देशासमोर सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात एक सकारात्मक आणि जीव वाचवणारा संदेश द्यावा,” अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

– विक्रम पाचपुते(आमदार, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!