spot_img
spot_img

शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांचा वाद शिगेला! पालकमंत्री थेट पोलीस ठाण्यात; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण

संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा ) :- एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर नवीन नगर रस्त्यावर ठाकरे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी आणि भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख श्रीराम गणपुले यांच्यात वाद झाले. महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी शहरात आलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस ठाण्यात जात पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची आणि आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी दुपारी झालेल्या या वादाचे वृत्त शहरात पसरल्याने पोलीस ठाण्यात अनेकांनी गर्दी केली होती. दुपारी गणपुले नवीन नगर रस्त्यावर असताना तेथे आलेल्या कतारी यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोघांमधील वादाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विखे शहरात आले होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचे वृत्त समजल्यानंतर ते लगेचच पोलीस ठाण्यात गेले. पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्यासह पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी कतारी यांच्यावर तातडीने कारवाई करून अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

दरम्यान विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर संगमनेर शहर आणि तालुक्यात हिंसक घटना घडत असून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. निवडणुक प्रचारादरम्यान हाणामारीच्या घटना घडू लागल्याने संगमनेर शहर व संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या पार्श्वभूमीवर काही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तणावपूर्ण बनलेले संगमनेर शहर निवडणुकीदरम्यान वेगळ्या मार्गावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!